९ मार्च, २०२५

मामाच्या गावाला जाऊया..

 सूं.. सूं .. सूं सूं विमान जाई

उंच ढगात झोके घेई

देशांची नावे सांगू या

मामाच्या देशाला जाउया

जाउ या

मामाच्या देशाला जाउया



मामा माझा नोकरदार

कंपनीच घर न दार

उंच इमारती मोजु या

मामाच्या देशाला जाउया


मामाची बायको गोरटी

म्हणेल काळी ही पोरटी .. हां ... ? हां

तिला मराठी शिकवूया ..

मामाच्या देशाला जाउया


मामाची बायको ख्रिश्चन..

तिच्या घरात नाही किचन

मग फास्ट्फूड रोज खाउ या ..

मामाच्या देशाला जाउया


काय मामाच्य देशाची पुर्वाई

पण, मन रमत नाही ..

घरीच लवकर जाऊ या..

मामाच्या देशाला जाउया


सूं.. सूं .. सूं सूं विमान जाई

उंच ढगात झोके घेई

देशांची नावे सांगू या

मामाच्या देशाला जाउया

जाउ या

मामाच्या देशाला जाउया

मळभ

निळे शुभ्र आभाळ तरी
सभोती मळभ कसे  ?

शुष्क तरुतळी
फुलांचे गंध कसे?

ना दिसे , तरी भासे
मग तोडू हे पाश कसे ?

विश्व वाहून गेले सारे,
सोबती नेऊ मी पार कसे? 

२२ ऑग, २०२४

#सहज #सुचल म्हणून ..

थोडस जरी लिहिलं तरी त्याला
आता tags जोडावेसे वाटतात.. 

tags चे दागिने माळल्या विना
लोक्स थोडी ना वाचतात .. 

कलेसोबत जगण्यासाठी कलाकार
पूर्वी फक्त पैशाचेच हिशोब ठेवायचे..  

आता likes आणि followers
हे सुद्धा टॅक्स भरायचे.. 😅

निव्वळ timepass म्हणून
लिहिणं, 

अभ्यास म्हणून
रेखटणं, 

गप्पा म्हणून
बडबडणं,

हे सुद्धा
हळूच या टॅक्सच्या कक्षेत येणार आहे 

कधी तरी दिलेली जांभई 🥱सुद्धा
नकळत monetize होणार आहे .. 

कदाचित उद्या नाही परवा नाही
पण होणार हे नक्की .. 

बातमी आहे खरी..
सूत्रांकडून पक्की .. 😆

- Veerendra 

16 June 2024 

१२ मार्च, २०१०

शोध

खूप दिवसानी
आज कविता शोधत होतो ..
कपाटात, डेस्कवर, फडताळात
पण काही केल्या मिळेचना..
मन हळू हळू सैरभैर
आतून कल्लोळ माजला ..
कविता हरवली ..
कविता हरवली ..
शोधावेग वाढला
आवाज ही ..
त्यातून एक आवाज घुमला
मी कुठ्ली हरवते? तूच हरवला होतास
मला मागेच सोडून.. भलतीकडे भरकटलास
मीच आले लपून.. तुझा माग घेत
कुणी दुसरी नाहीना भेटली याचा शोध घेत ..

आता पुन्हा लिही , मन तुझ चांगलंय
हे वेड्यासारख भरकटण कधी कुणाला चुकलंय ?

नजर

नव्हतीस तू जेव्हा,
दिवस रात्र वेगळे होते
वेळच्यावेळी सूर्यचंद्र
उगवत मावळत होते


तुझ्या एका कटाक्षाने
अश्शी नजर जडली
सूर्य चंद्रालाही
मोहिनी तुझी पडली


कसे असे या जगात
क्षणात बदल घडतात ?
आता दिवसाढवळ्या ही
स्वप्नांचे खच पडतात !!

वाडा

कोसळल्या तुळया
उरले चार कोपरे
भुईसपाट वाडा
उरले मातीचे ढिगारे

आठवणींचा धुळारा
आसमानास भिडला
आदिमवृद्ध प्राजक्त
क्षणात आडवा झाला


हातातील हात नकळत
सुटतील जातील दूर
वाड्याची संपेल घटका
संपेल साराच नूर

आगतिक किती चेहरे
रडके हताश बावरे
हसतील उद्यास जेव्हा
उठतील इथे मनोरे

उरतील आठवणी
वाड्यातील भांडणांच्या
गणपतीतील मखराच्या
चौकातील भोंडल्याच्या



..

उडतील पाखरेही, जातील दूर देशा
होतील ते रिकामे, मोजून रोख पैसा

म्हणतील ते मनात, गेले ते दिन गेले
चिकटून राहिल्याचे, पुरतेच चीज झाले !

६ मार्च, २०१०

काय तुझ्या अंतरी?




काय तुझ्या अंतरी? खोल जसा गाभारा,
घे मनाचा वेध, त्याचाच खेळ सारा ..

चुकलेली वाट, फसलेले खेळ
शब्दाची चौकट, मारलेली वेळ
हरवलेलं स्वत्व, धुसरलेला ध्यास
घट्ट मिटले डोळे, कोंडलेले श्वास
दे कल्पनांना छेद, संपेल वाद सारा..

कुठवर साथ? सुटले हात
ओठापुरत हासू, डोळ्यात भरे रात
वाट मागे सुटली, दूर कुठे वळली
नव्याने नजर पुन्हा, क्षितिजाला खिळली
होईल पहाट , उजळेल आसमंत सारा

घे मनाचा वेध, त्याचाच खेळ सारा ..

१७ मे, २००९

हॅंग ओव्हर

पार्टी संपली, रात्र सरली दुपारही टळली,
तरी हॅंग ओव्हर चालूच आहे

इवलेसे घर त्यात
देह दीड हात
मातीत मळलेले पंजे
आणि पाय आभाळात..
करुन करुन करणार काय
खाली डोके वर पाय
माझी नव्हती इच्छा अशी
खेळ दैवाचा दुसरं काय ..
दुपार झेलत झेलत
वाट पहाणं रात्रीची
कित्येक तास चालूच आहे ..

हाका.. हाका .. हाका..
हाका चारी दिशांनी ..
घर डोक्यावर घेतले आहे
घोंगावणा-या माशांनी
भिंतीवरचा बिग बी चिडतो
तो ही माझ्यावर ओरडतो
माझा घसा कोरडतो ..
मी कोप-यात बसून
रडतो ...
हे असेच
किती युगे चालू आहे ?

नाचरं आकाश, नाचते ही धरा
त्यांचा फक्त नाच, माझ्या घराला चिरा ..
घर आवरले जरी , कसे सावरू मन .
वा-याने उडू पाही जसे सुकले पान ..
मी त्याल पकडावे .. त्याने दूर उडावे ..
हेच चालू आहे .
..
तू यावं आणि लपून
तिनं बोलावं
हेच चालू आहे !

मी !

मी
थेंब दवाचा
मेघ नभाचा
उधळ मातीचा ... मी

मी
वास फुलांचा
पंख मोराचा
भास वनांचा .. मी

मी
जन्म रुतूंचा
ओघ नद्यांचा
शब्द सख्यांचा ... मी !

८ मे, २००९

फेअरवेल

फेअरवेल फ़्रेन्ड
माझा रोल संपलाय.
माझ्या तुझ्या रस्त्याला
मागेच फाटा फुटलाय ..

तु दिलेल्या शब्दांची 
हास्याची, 
आसवांची, 
नजरेची
साठवण केलीय मनाच्या बरणीत..
कडु झाल मन.. 
नाहीच गेला वेळ
एखादी गोळी चघळीन त्यातली..
अडलेलं,चुकलेलं नक्की सुटेल गणित ..

नाहीतर चार गोळ्या
वाटीन एक दोघांना
निदान त्यांच गणित
तरी पक्क होईल

फेअरवेल फ़्रेन्ड, फेअरवेल ..
माझा रस्ता मला बोलावतोय
आत्ता धूसर असलेला चेहरा
बरोबर यायला खुणावतोय ..


१० डिसें, २००८

उन्मुक्त

ना रंगाचे ना रेषांचे , तालाचे ना लयीचे
आकाराचे ना विकाराचे, नाहीत कुठले पाश
वा-यावरल्या पाखराचे, माझे मुक्त आकाश

भिरभिरत्या नजरेत, साठवतो नियतीचे इशारे
रात्रीच्या डोहात माझिच प्रतिमा शहारे
कंठही होतो कोरडा न निशब्द
आवाज फुटत नाही, मूठ वळते फक्त ..

चिरडत्या भावनांचे, कानी येती आक्रोश
मीच फाडू लागतो, भोवतीचा कोष
मला उडायचे, जगायचे उन्मुक्त ..
असेच ना मरायचे गोठवून रक्त ..

उन्मुक्त उडण्याची जेव्हा ओढ लागते धरू
फडफडत्या ज्वालांतून ही उडते फुलपाखरू ..

२ सप्टें, २००८

रेष

अस्तित्व तुझे विरलेले..
नसून सर्वत्र उरलेले..
नजरेत भरून तुझीच आस..
खुणावती .. खुळावती
तुझेच भास ...

दिशांदिशातून तूच
ना तुझा एक देश..
पृथ्वीला बांधणारी
तू क्षितिजाची रेष ...

वेडी वाट

दारात तुझ्या
पाऊलठसे
कोणाची चाहूल
वाटे तुला?

मन भरू येता
एकले एकले होता..
हात धरू कोणाचा?
वाटे तुला?

शून्यात ही नजर
मनात हा काहूर
कोणास पाहून लाज
वाटे तुला ?


ज्या जन्मसख्याची
पाहिलीस वेडी वाट
त्याला सांगायला भिती 
वाटे तुला ? ...

कागद..

तसा माणूस जन्माला येतो तो
को-या कागदासारखाच..
कुणी शुभ्र सफेद कांतीचा
तर कुणी डागाळलेल्या अंगाचा..

त्यानंतर सुरू होतो फक्त प्रवास

कुणी चित्रकाराच्या हाती तर कुणी ज्योतिष्याच्या
कुणी विद्यार्थ्याच्या हाती तर कुणी पत्रकाराच्या
लेखण्यांचे, टाईपरायटरचे वार झेलत पुढे पुढे जातो..
मरतो..
परत जन्माला येतो.
उद्देश हरवल्यासारखा भिरभिरतो परत..

सुदैवानं काही कागद अमर होतात..
काही पुजले जातात..
पुरावे समजून जाळलेही जातात,

काही सुदैवी ना दुर्दैवी ..
त्यातलाच मी एक कागद..
या कवीच्या हातातला

२९ ऑग, २००८

खो खो ?

स्नेहा नं या खो खो च्या खेळात सहभागी करुन घेतलं आणि म्हणून प्रथमच या ब्लॊगवर मी माझ्या मनाला भावलेली ही एक कविता लिहीत आहे.

कवी : कुसुमाग्रज

सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी ?

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजुन जळते अंतर ज्योती
कसा सावरू देह परी?

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती आतून
मिटाय झाले अधीर लोचन
खड्ग गळाले भूमिवरी

पावन खिंडीत पावन होऊन
शरीर पिंजे तो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता तरी ?



---


दुसरी कविता आहे संदीप खरेची .. तशी त्याची अनेक गाणी मनाला भावून जातात पण त्याची काही गाणी अशी आहेत की जी कधी कधी तुमच्या जगण्याच्या पद्धतीला फिट्ट बसतात.. त्यातलंच हे एक..

कवी - संदीप खरे.

हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
या जगण्याचे ही कारण नक्की काय, अजून धाट्त नाही

दु:खावर मी केली अश्शी मात,
हसता हसता दुखून आले दात,
आरसा म्हणतो हसणा-या बाळा, मी फसत नाही !

माझे जिणे भरभरलेले ढग,
पाण्याने या पोटी लागे रग,
देवाजी ची किमया हे पाणी कधी आटत नाही !

चालत रहाण्यासाठी जो हट्टी,
त्याची नेहमी खड्ड्यांशी गट्टी,
अस्सा मी प्रवासी त्याला गाव कधी भेटत नाही !

हाती येता कागद लिहीतो मी,
आपली आपण टाळी घेतो मी,
शब्दांनी या बेरड होता पान कधी फाटत नाही !

दुर्दैवाच्या दुर्दैवाते ते
माझ्या रूपे निर्लज्जा भेटे,
कानी देते धमक्या ते हजार मी बधत नाही !

हे नशीब काही सोडेल माझी पाठ असं वाटत नाही
या जगण्याचे ही कारण नक्की काय, अजून धाट्त नाही


आता खो कुणाला देऊ ..
जो पहिली कॊमेट करेल त्याला .. अन जो पहिली पोस्ट वाचेल त्याला !

:P

२७ ऑग, २००८

तू लिही

तू लिही
लिही ना.. कविता ..
लिहिलंस की बरं वाटेल
काहीही लिही.. लिहीत सूट
लपवू नकोस ठसठसती मूठ

कुठे तरी हरवून, काही तरी सापडेल,
काय माहित तीच वाट, मनाला ही आवडेलस
शोधणार्‍या माणसाची कधीच नसते हार..
आता बास झाल म्हणून थांबू नको यार..

लिही रे अजून थोडं .. तुझं मरण टळेल..
आयुष्य किती सुंदर असतं, कधीतरी कळेल..

२३ एप्रि, २००८

फुलं

फुलं वाळवंटात फार टिकत नाहीत..
आणि उगवत ही नाहीत.. 

बर .. 

तु म्हणतेस तर तेही खरंच असेल ..
पण माझं आणि दैवाच जमणं थोडं अवघडच आहे..
वाळवंटात्ल्या वा-याला जसा कोरडॆपणा असतो ..
आणि दगडाला असते कणखर धार ..
तसंच काहीस माझ्या मनाच होतय यार ..

कुठे तरी सोड्लेली वाट मनाला अजून खुणावत रहाते ..
आणि नियती ... आई सारखी ओढत ओढत .. पुढे पुढे नेते ..
माहित आहे आमचं चांगभल होणार ..
पण तरी या मनाला कोण समजावणार ?


सये .. तु म्हणतेस म्हणून परत कविता लिहिन ही ..
पण तिला आर्तपणाची जाणिव आणि शब्दामधे ओलावा नाही ..
म्हणून दूर करायच नाही ..
पण . छे गं ..
कविता आता .. सुटलीच..

कविच जगण खरच सोप्प असत ..
चार ओळी लिहिल्या की मरायची परवानगी असते त्याला ..
पण मी ना धड कवी .. ना ..कुणी
असो..लिहीन तरीही ..

निळी निळी रात सये

चांदण्यात फिरायला कोणाला आवडत नाही ? अशीच एक कविता ..
त्या दोघांवरची .. अर्थात काल्पनिकच ! :)



निळी निळी रात सये
निळी निळी रात
चांदणं माझ्यासवे ..
तारका नभात
निळी निळी रात सये
निळी निळी रात


जरा असे करू
तुझ्या भांगात चांदण्या भरू,
उधळ थोड्या हवेत ..
थोड्याच घरी नेऊ
उजळू दे रूप तुझे
या चंद्रप्रकाशात ..
निळी निळी रात सये
निळी निळी रात


आज गर्द चांदण्याची
होऊ दे बरसात ..
नितळ निळी स्वप्ने
हाती तुझा हात ..
त्या वाटांवर हवी ..
फक्त तुझी साथ
निळी निळी रात सये
निळी निळी रात


चल भरू ही वेळ
कापर्या श्चासात
मुके शब्द, व्यक्त मौन
विरू दे वा-यात
निळी निळी रात सये
निळी निळी रात

३० मे, २००७

मी कसा आहे?

मी कसा आहे ?
तुम्हाला हवा तसा आहे..
फिशटँक मधला मासा आहे ..

मी कसा आहे ?
सुन्न डोळ्यांचा हसरा चेहरा आहे ..
जणू तुमच्या मनाचा आरसा आहे..

मी कसा आहे?
शब्द माझे जीव ..
अश्रू माझे प्राण
माणूस असावा अगदी तसा आहे ..

मी थोडा असा आहे
मला एकान्ताची साथ ..
माझी अनुभावाची वाट ..
चेहरे शोधणारी
माझी वेगळी जात आहे...

मी थोडा असा आहे
थोडा वेडा थोडा शहाणा ..
पायात माझ्या काटेरी वाहाणा ..
आधाराला हाती
नियतीची काठी ..
तिच्यासोबत आयुष्य
आता जगणार आहे ..

एक पान

एक पान सुकलेलं,
वा~यानं ही फुंकलेलं
वेड्या स्वप्नांमागे
पळत सुट्लेलं ..

एक् पान चिंब ओलं,
पावसालाच भ्यायलं
कोंब कोवळा पाहून
स्वत:वरच हसलं..

एक पान खरंड्लेलं,
काळ्या शाईनं भरडलेलं
कोण्या वेड्यासाठी
खूप हमसून रड्लेलं..


एक पान नव्व कोरं,
ऐटीमध्ये मिरवणारं
माझ्या शब्दांना
पोटी रूजवणारं..


एक् पान शेवटचं,
कध्धीच न हसणारं
नको म्हटलं तरीही
हळूच समोर येणारं ..