१२ मार्च, २०१०

नजर

नव्हतीस तू जेव्हा,
दिवस रात्र वेगळे होते
वेळच्यावेळी सूर्यचंद्र
उगवत मावळत होते


तुझ्या एका कटाक्षाने
अश्शी नजर जडली
सूर्य चंद्रालाही
मोहिनी तुझी पडली


कसे असे या जगात
क्षणात बदल घडतात ?
आता दिवसाढवळ्या ही
स्वप्नांचे खच पडतात !!

वाडा

कोसळल्या तुळया
उरले चार कोपरे
भुईसपाट वाडा
उरले मातीचे ढिगारे

आठवणींचा धुळारा
आसमानास भिडला
आदिमवृद्ध प्राजक्त
क्षणात आडवा झाला


हातातील हात नकळत
सुटतील जातील दूर
वाड्याची संपेल घटका
संपेल साराच नूर

आगतिक किती चेहरे
रडके हताश बावरे
हसतील उद्यास जेव्हा
उठतील इथे मनोरे

उरतील आठवणी
वाड्यातील भांडणांच्या
गणपतीतील मखराच्या
चौकातील भोंडल्याच्या



..

उडतील पाखरेही, जातील दूर देशा
होतील ते रिकामे, मोजून रोख पैसा

म्हणतील ते मनात, गेले ते दिन गेले
चिकटून राहिल्याचे, पुरतेच चीज झाले !

६ मार्च, २०१०

काय तुझ्या अंतरी?




काय तुझ्या अंतरी? खोल जसा गाभारा,
घे मनाचा वेध, त्याचाच खेळ सारा ..

चुकलेली वाट, फसलेले खेळ
शब्दाची चौकट, मारलेली वेळ
हरवलेलं स्वत्व, धुसरलेला ध्यास
घट्ट मिटले डोळे, कोंडलेले श्वास
दे कल्पनांना छेद, संपेल वाद सारा..

कुठवर साथ? सुटले हात
ओठापुरत हासू, डोळ्यात भरे रात
वाट मागे सुटली, दूर कुठे वळली
नव्याने नजर पुन्हा, क्षितिजाला खिळली
होईल पहाट , उजळेल आसमंत सारा

घे मनाचा वेध, त्याचाच खेळ सारा ..